संपर्क : 94200 94243

.

ए.ए. काय करते व काय करत नाही?

ए.ए. काय आहे?

  जे स्त्री पुरुष कधी काळी दारुच्या व्यसनाला बळी पडले होते अशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए.ए.) अव्यावसायिक, स्वावलंबी, सर्व जाती धर्मांसाठी आहे. राजकारणाला ह्यामध्ये स्थान नाही आणि ए.ए. शी संपर्क साधण्याची सुविधा जवळ जवळ सर्वत्र उपलब्ध आहे. ज्याला आपली दारुच्या व्यसनातून मुक्तता करुन घ्यायची आहे अशा कोणत्याही व्यक्तीला ह्या संस्थेत प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी वय किंवा शिक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अट नाही.


ए.ए. काय करते?

  1. ज्या व्यसनाधीन व्यक्तीला ए.ए. च्या सभासदांच्या मदतीची आवश्यकता आहे अशांना ए.ए. सभासद आपले अनुभव सांगतात. ए.ए. मध्ये नवीन येणा­ऱ्या सदस्यांना व्यक्तिगत पातळीवर किंवा प्रायोजक पध्दतीने सर्व प्रकारे मदत दिली जाते.
  2. बारा पाय­ऱ्यांच्या माध्यमातून दिला गेलेला ए.ए.चा कार्यक्रम व्यसनाधीन व्यक्तीला दारुशिवाय समाधानी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो.
  3. ए. ए. च्या समूह बैठकीत ह्या कार्यक्रमांविषयी चर्चा होते.
    1. खुली वत्कृत्व बैठक : ह्यामध्ये व्यसनाधीन असलेली व नसलेली माणसं ही भाग घेऊ शकतात. (ए.ए. म्हणजे काय? ती काय करते? व काय करत नाही? हे जाणून घेण्यासाठी ए.ए. च्या खुल्या बैठकीत उपस्थित राहणे हा सर्वात चांगला मार्ग आहे.) ह्या बैठकीत ए.ए. सदस्य त्यांची कहाणी सांगतात. त्यांची व्यसनाधीनता, ते ए.ए. मध्ये कशाप्रकारे आले आणि ए.ए. मुळे त्यांचे जीवन कशाप्रकारे बदलले ह्या विषयी हे वक्ते सांगतात.
    2. खुली चर्चा बैठक : आपल्या व्यसनाधिनतेच्या अनुभवाविषयी एक सदस्य थोडक्यात बोलतो आणि नंतर ए.ए. चा सुधारणा कार्यक्रम किंवा व्यसनाच्या संदर्भातील एखाद्या व्यक्तीने उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत चर्चा होते. (बंद बैठका फक्त ए.ए. सदस्य किंवा संभाव्य व्यसनी व्यक्तीसाठीच असतात.)
    3. बंद चर्चा बैठक : खुल्या चर्चा बैठकांप्रमाणेच ह्यांचे स्वरूप असते फक्त ह्या व्यसनी किंवा संभाव्य व्यसनी लोकांसाठीच असतात.
    4. पायरी बैठक (सर्वसाधारण : बंद) : बारा पाय­ऱ्यांपैंकी एका विषयी चर्चा.
    5. सुधारणा किंवा औषधोपचाराच्या संदर्भातही ए.ए. सदस्य बैठका घेतात.
    6. ए.ए. च्या संदर्भात महिती देण्यासाठी ए. ए. सभासदांना सभेचे आयोजन करायला सांगितले जाऊ शकते. या स्वरूपाच्या बैठकीची गणना ए. ए. च्या नियमीत समूह बैठकीत होत नाही.

औषधोपचाराची सुविधा देणारे सभासद

  गेल्यावर्षी ह्या प्रकारचे बरेच सभासद ए.ए. मध्ये दाखल झाले, कांही स्वेच्छेने आले, तर कांही थोड्या दडपणामुळे. ए.ए. सभासद कशा प्रकारे सहकार्य करतात ते ह्या पुस्तिकेत दिले आहे. कोणीही संभाव्य ए.ए. सदस्य जर न्यायालय, कार्यालयाचा मालक किंवा अन्य कुणाच्या दडपणामुळे आमच्याकडे आला असला तरी आम्ही त्याच्या संदर्भात भेदभाव करू शकत नाही. स्वत:ची इच्छा हे आमच्या कार्यक्रमाचे आणि सभासदत्वाचं मूलभूत तत्व आहे. पण आमच्यापैकी बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी कोणाच्या ना कोणाच्या दडपणामुळे ए.ए. च्या बैठकीत पहिल्यांदा हजेरी लावली. पण सातत्याने ए.ए. च्या संपर्कात राहिल्याने आम्हाला आमच्या आजाराचे स्वरूप कळाले. ए.ए. ची शिफारस कोणी केली ह्याला ए.ए. महत्व देत नाही. ए.ए. ला काळजी असते व्यसनाच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तिची. ह्या व्यसनातून कोण मुक्त होऊ शकेल ह्यांचा अंदाज आम्ही वर्तवू शकत नाही. कोणा रोग्याने कशाप्रकारे इलाज करवून घ्यावा ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकारही आमचा नाही.


बैठकीतील उपस्थितीचा पुरावा

  ए.ए. ची शिफारस करणा­ऱ्या संस्था कधी-कधी बैठकीला हजर असल्याचा पुरावा मागतात. काही एखादी पावती संभाव्य सभासदास देतात. तो सभासद ए.ए. सचिवाची सही घेऊन ती पावती उपस्थितीच्या पुराव्याच्या रूपात सादर करतो. काही समूह दुस­ऱ्या प्रकारे सहकार्य करतात. त्याची पध्दत आखीव रेखीव नसते. पण ह्यामध्ये प्रत्येक सभासदाची सक्रीयता महत्त्वाची असते. ए.ए. च्या पध्दतीत ह्या पुराव्यांना स्थान नाही. प्रत्येक समूह हा स्वावलंबी आहे आणि उपस्थितीचा पुरावा द्यावा अथवा देऊ नये ह्या संदर्भात प्रत्येक समूहाने स्वत: निर्णय घ्यावा.


दारू न पिणारा व्यसनी

  उपचार केंद्रामध्ये दारू आणि गर्द च्या व्यसनात गुंतलेले लोक एकत्र येतात. ह्या उपचार केंद्रांतून बाहेर पडणा­ऱ्या लोकांना (दारू पिणारे आणि न पिणारे देखील) ए.ए. बद्दल माहिती सांगितली जाते आणि ए.ए. च्या बैठकीना उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आधी सांगितल्याप्रमाणे ए.ए. च्या खुल्या बैठकीला कोणीही उपस्थित राहू शकते. पण दारूच्या व्यसनाचे बळी ठरलेलेच बंद बैठकीला उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. चे सभासद बनू शकतात. फक्त दारूच्या व्यसनासंदर्भात समस्या असेल अशांनाच ए.ए. मध्ये प्रवेश मिळू शकतो. हेरॉईन चे व्यसन जडलेल्यांच्या उपचार पध्दतीचे जनक ए.ए. च्या सामान्य सेवा मंडळाचे खूप वर्षापर्यंत विश्वस्त असलेल्या डॉ. विन्संट डोल ह्यांनी पुढील विधान केले आहे. ए.ए. चे कार्यक्षेत्र एका विषयापुरते मर्यादित आहे आणि हेच ए.ए. च्या शक्तीचे रहस्य आहे. ए.ए. चे ध्येय आहे दारूच्या व्यसनाला बळी पडलेल्यांना मदत करणे. ह्या एकमेव ध्येयाचा ध्यास घेतल्यामुळे ए.ए. ला मिळालेलं यश दुस­ऱ्या ध्येयाच्या पूर्तीतही खात्रीलायकपणे मिळेल असे म्हणणे ही मोठी चूक आहे. म्हणून आम्ही अशा लोकांना ए.ए. च्या अनुभव विश्वात सहभागी करू इच्छितो की, जे ए.ए. पध्दतीचा उपयोग करून गर्द किंवा तत्सम अन्य प्रकारच्या व्यसनात अडकलेल्या लोकांच्या व्यसनमुक्तीसाठी एक स्वतंत्र पध्दत किंवा कार्यक्रम तयार करू शकतील.


ए.ए. काय करत नाही?

  1. ए.ए. व्यसनाधीन माणसाला त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रवृत्त करत नाही.
  2. सभासदांची मनधरणी करत नाही.
  3. स्वत: संशोधन करत नाही व संशोधनाचे प्रयोजन करत नाही.
  4. हजेरी पुस्तक ठेवत नाही व जुन्या लोकांच्या माहिती संदर्भात कागदपत्र ठेवत नाही.
  5. सामाजिक संस्थांच्या सभा, परिषदामध्ये भाग घेत नाही.
  6. सभासदांचा पाठपुरावा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही.
  7. शारीरिक किंवा मानसिक रोगांचे निदान करत नाही.
  8. सेवा, सुश्रुषा, रूग्णालय सेवा, औषधे किंवा कुठच्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक उपचार पुरवत नाही.
  9. धार्मिक सेवा पुरवत नाही.
  10. दारू विषयी शिक्षण देत नाही.
  11. अन्न, वस्त्र, निवारा, नौकरी, पैसा किंवा कोणतीही अन्य सामाजिक सेवा, सुविधा पुरवत नाही.
  12. घरगुती किंवा व्यावसायिक स्तरावर उपदेश करत नाही.
  13. दिलेल्या सेवेबद्दल पैसे घेत नाही किंवा ए.ए. संस्थेबाहेरील व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारच्या देणग्या स्वीकारत नाही.
  14. नोकरी व्यवसायाशी संबंधीत संस्था, वकील, न्यायालयीन कामकाजासाठी संदर्भपत्र देत नाही.

अनुमान

  मदत मिळण्याची अपेक्षा करणा­ऱ्या दारूच्या व्यसनाधीन व्यक्तींपर्यंत आमचा संदेश पोहचविणे हा ए.ए. चा मूळ उद्देश आहे. दारूच्या व्यसनातून मुक्त करणाऱ्या सा­ऱ्या उपचार पध्दतींचा हेतू व्यसनी व्यक्तींना दारूपासून दूर राहण्यास मदत करणे हाच असतो. आमचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी आम्हाला एकाच ठिकाणी जायचे आहे. व्यसनाधीन व्यक्तीची सुधारणा आम्ही संघटीत होऊन ते काम करतो, जे आम्ही स्वतंत्रपणे करू शकत नाही. सुधारणेच्या मार्गावर व्यसनाधीन व्यक्तीला आम्ही आमच्या व्यक्तीगत अनुभवांचा प्रकाश दाखवून सहाय्य करू शकतो.