.
ए. ए. चा इतिहास
१९३४ च्या जूनच्या सुमारास बिल डब्लू. अतिमद्यपानाने भयंकर आजारी पडले. सेंट्रल पार्क वेस्ट येथील चार्लस बी टाऊन हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. विल्यम सिल्कवर्थ हे मानसोपचार तज्ञ त्यांच्यावर उपचार करत होते. एके काळी डॉ. सिल्कवर्थ ह्यांना अशी आशा होती होती की उपचाराने बिल डब्लू. सुधारतील. परंतु आताची परिस्थिती पाहिल्यावर डॉक्टरांनी ती आशा सोडून दिली होती. बिल डब्लू. ना पहिल्यांदाच जाणवले की आपण सुधारण्याच्या पलिकडे गेलो आहोत. त्यांची पत्नी लुईस डॉक्टरांकडे बसली होती. डॉक्टर तिला समजावून सांगत होते बिलच्या बाबतीत आपल्याला आता कसलीही आशा उरली नाही. हा 'होपलेस' माणूस आहे. परंतु लुईसला ते म्हणणे पटत नव्हते. ती म्हणत होती, 'डॉक्टर, बिलकडे इच्छाशक्तीचे भांडार आहे. जर त्याने एखादी गोष्ट मनात घेतली तर ती गोष्ट पुरी करण्यासाठी झटणारा त्याच्यासारखा माणूस तुम्ही बघितला नाही, तो बरे होण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो आहे. आम्ही सर्व काही प्रयत्न करत आहोत. असे असताना तो दारू का थांबवू शकत नाही ?' डॉक्टरांनी जे उत्तर दिले ते उत्तर म्हणजे 'मद्यपाश' हा आजार कसा आहे त्याची प्राथमिक ओळख होती. डॉक्टर म्हणाले, 'केवळ कुतुहलातून बिल ने पिणे सुरू केले. त्याची आवड निर्माण झाली, ह्या आवडीची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्याचे रूपांतर सवयीत झाले. ह्या सवयीतून आसक्ती निर्माण झाली ह्या आसक्तीमुळे शहाणपण लयाला जाऊन वेडेपण वाढले आणि मग इच्छा नसली तरी आसक्ती त्याला दारू पिणेस भाग पाडते.'
डॉ. विल्यम डंकन सिल्कवर्थ, एम.डी. ह्यांना मेडीसीन मधील ए. ए चे प्रथम मित्र म्हणून सन्मान आहे. ह्यांनीच बिल डब्लू. ह्यांच्यावर उपचार केले आणि सोबर होण्यास मदत केली. त्यांचे टोपन नाव सील्की असे होते. 'अल्कोहोलिझम' ह्या आजाराचे स्वरूप त्यांनीच सांगितले 'फिजीकल ॲलर्जी आणि मेंटल ऑफसेशन' ए. ए चा रिकव्हरी कार्यक्रम तो तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी ४०,००० मद्यप्यांवर उपचार केले आणि सुधारण्यास मदत केली. ए. ए ला मेडिकल व्यवसायिकांकडून मदत मिळवून देण्यास ते अग्रेसर होते. जुलै १९३९ मध्ये त्यांनी 'फर्स्ट मेडिकल पेपर ऑन ए. ए' लिहला ज्यामुळे मेडिकल जगतात 'अल्कोहोलिझम'ला मान्यता मिळाली..
ऑगस्ट १९३४ मध्ये बिल डब्लूचा एक मित्र एबी टी. हा ऑक्सफर्ड ग्रुप मध्ये जाऊन सोबर झाला होता. एबी हा शालेय मित्र आणि पिण्यातील सोबती सुद्धा होता. एबी टी. ला माहिती मिळाली म्हणून १९३४ नोव्हेंबर महिन्यात एका दुपारी त्याने बिलला फोन केला. बिलने त्याला ताबडतोब भेटायला बोलावले. कारण त्याला भेटण्याच्या निमित्ताने त्यांना आणखी पिण्याची संधी मिळेल. एबी ताबडतोब आला. बिलच्या किचनमध्ये त्यांची भेट झाली. टेबलावर त्या दोघांच्या मध्ये जीनचा मोठा ग्लास आणि ॲपल ज्यूस ठेवला होता. बिल ने एबी ला जीन घेण्यासाठी सांगितले. पण त्याने नम्रपणे ती नाकारली. बिलला आश्चर्य वाटले. त्याने त्याच्याकडे निरखुन पाहिले. तेजस्वी चेहऱ्याचा, चकाकणाऱ्या डोळ्यांचा आपला हा मित्र त्याला नवीन वाटला. त्याला वाटले हा देखिल एक क्रोनिक अल्कोहोलिक माझ्या सारखाच असा काय ह्याच्यात बदल घडला की हा दारूला नाही म्हणू शकतो. बिलने त्याला विचारले एबी असे काय घडले की तू सुधारलास आणि त्यानंतर एबी जे बोलला ती एए च्या कार्यक्रमाची ओळख होती. तो म्हणाला मी धर्माची दिक्षा घेतली आहे. असा धर्म ज्याला काही विशेष नाव नाही. मी अशा एका समुहात गेलो ज्याचे नाव ऑक्सफर्ड समुह आहे. त्या समुहाने मला काही कल्पना सुचवल्या. मी स्वतःचा पराभव मान्य करायला शिकले पाहिजे, मी माझी तपासणी केली पाहिजे आणि माझ्या चुकांची कबूली जबाब दुसऱ्या एखाद्या माणसाजवळ विश्वासाने दिला पाहिजे. मी दुसऱ्यांना ज्या इजा केल्या आहेत त्या बद्दल भरपाई करायला शिकलो. ज्याच्यावर किंमतीचे कुठलेही लेबल नसेल अशा पध्दतीने मी मला जे मिळाले आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला माहीत आहे हे सर्व तुला विनोदपूर्ण वाटेल. पण त्यांनी मला शिकवले की देवाकडे ह्या सर्व पर्यायांबद्दल शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी आणि जर मी देवाला मानत नसेन तरी प्रार्थना करत रहावी आणि बिल मी ह्या सर्व गोष्टी केल्या. मी मोकळ्या मनाने प्रयत्न केला. लवकरच माझी दारू पिण्याची इच्छा निघून गेली आणि गेले काही महिने मी दारू प्यायलो नाही. ह्या वार्तालापामध्ये एबी ने एक महत्त्वाची गोष्ट बिलला दाखवून दिली ती म्हणजे एक सुधारलेला मद्यपी जेव्हा दुसऱ्या सफरिंग अल्कोहोलिक बरोबर बोलतो तेव्हा सफरिंग अल्कोहोलिक विचार करतो. बिलची जरी दारू सुरूच होती तरी त्याने विचार केला की त्याला त्याच्या धार्मिक विचारांची झडती घेतली पाहिजे. कालवारी चर्च येथे ऑक्सफर्ड ग्रुप चालायचा. तेथे फादर सॅम शुमेकर होते. बिलच्या घरापासून कालवारी चर्च पर्यंतचा रस्ता फार लांब होता. बिल चालत निघाले. अर्थातच एखाद्या मुरलेल्या मद्यप्याप्रमाणे त्यांनी देखील रस्त्यात जे बार लागत होते त्यांना भेट देणे चालू ठेवले. बराच वेळ निघून गेला आणि ते विसरून गेले की ते कशासाठी घरातून बाहेर पडले आहेत. ॲलेक नावाच्या एका मद्यप्याबरोबर ते बसले होते.
ॲलेक नी सांगितले की तो एक सेलमेकर आहे, आणि सेलमेकर आणि शुमेकर ह्यातील साम्यामुळे बिलना परत आठवले की आपण कशासाठी बाहेर पडलो आहोत. बिल व ॲलेक हे दोघेही मिशनच्या दरवाजापर्यंत पोहचले. तेथे त्यांना एबी टी. भेटला. एबी त्यांना सभेला घेऊन गेला. त्या सभेमध्ये स्तोत्र व प्रार्थना केल्या जात होत्या. त्या ठिकाणी बिलला सुधारलेले मद्यपी भेटले. तसेच त्यांना देवाच्या कृपेचा साक्षात्कार झाला. हे काही तरी नवीन होते आणि बिलच्या मनात आशा निर्माण झाली. मी सुद्धा मद्यमुक्त राहू शकतो. ते घरी आले आपली पत्नी लुईसला तो अनुभव सांगितला. पण 'येरे माझ्या मागल्या'... तिसऱ्या दिवशी बिलच्या मनात एक विचार आला. जर मला कॅन्सर झाला असता तर मी डॉक्टरकडे गेलो असतो आणि त्याला म्हणालो असतो 'मला वाचवा'. त्यांना सांगितले असते की, 'त्या दुखणाऱ्या भागाला नष्ट करा किंवा कापून टाका. मला बरे करा.' मग मद्यपाश हा जो आजार आहे त्याचा सर्वश्रेष्ठ सर्जन त्याच्याकडे मी का जाऊ नये? जीवनदान का मागू नये? त्यांनी एक जाणले की मी जर एबी ने सांगितलेली तत्वे आचरणात आणली तर मी मद्यमुक्त राहू शकेन. ह्यासाठी चांगल्या मनस्थितीत व शारिरीक स्थितीत येण्यासाठी बिलने चार्लस टाऊन हॉस्पिटल येथे ॲडमिट होण्याचे ठरवले.
ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. त्यांच्या खिशात सहा सेंट होते. रस्त्याने चालत असताना त्यांच्या मनात एक विचार आला. एका दुकानात त्यांची थोडीफार उधारी चालायची. तिथून चार बाटल्या बियरच्या उधार घ्याव्या आणि हा रस्ता आरामदायी बनवावा. टिपीकल अल्कोहोलिक प्रमाणे त्यांनी चार बाटल्या घेतल्या. दोन प्यायले, एक रस्त्यात एकाला दिली आणि चौथी बाटली पीत-पीत ते हॉस्पिटल मध्ये पोहचले. तेथे डॉ. सिल्कवर्थ ह्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांना एबी टी. व ऑक्सफर्ड ग्रुप बद्दल सांगितले. त्यांची तत्वे सांगितले. डॉक्टर म्हणाले बिल तू सध्या वर जाऊन बेडवर झोप आणि आराम कर. डिसेंबर १९३४ चा तो कालावधी होता. तीन-चार दिवस हॉस्पिटल मध्ये बिलवर उपचार चालू होते. बिल अत्यंत निराश झाले होते. अजूनही बिल देवाबद्दल साशंक होते. एके दिवशी सकाळी एबी हॉस्पिटल मध्ये आला. बिल त्याला म्हणाले परत एकदा जरा तू तुझ्या सोब्रायटीचा फॉर्म्यूला सांग. एबी म्हणाला, 'तू मान्य कर तू हरला आहेस. तू तुझ्याशी प्रामाणिक रहा. ते तू दुसऱ्या कुणाला तरी सांग. तू ज्यांना दुखावले आहेस त्यांची भरपाई कर. कोणतीही अपेक्षा न करता जे तुला मिळाले ते दुसऱ्याला दे. तू मानतोस त्या देवाकडे प्रार्थना कर. हे इतके सोपे आहे.' काही वेळाने एबी निघून गेला. बिल ह्यांची निराशा अजून वाढली. आपण एका खोल खड्डयात पडलो आहोत अशी त्यांना जाणीव झाली. अजूनही माझ्यापेक्षा कोणी उच्च शक्ती आहे हे मान्य करायला बिल ह्यांची तयारी होत नव्हती.
... पण अचानक एका क्षणी त्यांच्यात जो अहंकार होता त्याचा चुराडा झाला आणि ते ओरडले, 'जर का देवाचे अस्तित्व असेल तर त्याने त्याचा पुरावा दाखवावा. मी काहीही करायला तयार आहे', अचानक हॉस्पिटलची ती रूम पांढऱ्या प्रकाशाने भरुन निघाली. 'मी परमानंदाने भरून गेलो, मी त्याचे वर्णन करू शकणार नाही, माझ्या मनाला अशी जाणीव झाली मी एका पर्वतावर उभा आहे आणि पवित्र आत्म्याचा मला स्पर्श होत आहे.' (बिलने केलेले वर्णन आहे हे...)
नंतर त्यांना काहीतरी स्वतःवर फुटल्यासारखे जाणवले आणि ते एक स्वतंत्र माणूस आहेत ही जाणीव झाली. हळूहळू हा परमानंद ओसरू लागला. ते बेडवर आहेत. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. बिलना भीती वाटत होती हा अनुभव कसला? आपल्याला हॅलोसनेशन झाले का? डॉक्टरांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. शेवटी डॉक्टर म्हणाले, 'नाही बिल, तू वेडा नाहीस. इथे काही तरी मानसिक किंवा आध्यात्मिक घटना घडली आहे. मी त्याबद्दल पुस्तकात वाचले आहे. काही वेळा आध्यात्मिक घटना घडली आहे मी त्या पुस्तकात वाचली आहे. काही वेळा आध्यात्मिक अनुभव हा मद्यपाशातून मुक्तता करतो'.
बिल त्या घटनेबद्दल विचार करत राहिले. बिलना लवकरच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. ते ऑक्सफर्ड ग्रुप मध्ये सामिल झाले. फादर सॅम शुमेकर ह्यांचे कालवारी मिशन आणि टाऊन हॉस्पिटल हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले. लुईस अजूनही डिपार्टमेंट स्टोर मध्ये काम करत होती. डिसेंबर १९३४ ते मे १९३५ पर्यंत बिलने मद्यपींसाठी अतोनात काम केले. परंतु ते एकालाही सोबर करू शकले नाही. ह्या काळात सर्व परिचीत व ऑक्सफर्ड ग्रुपवाले म्हणायला लागले, 'बिल काही काम करत नाही.' कुटुंबासाठी कमवत नाही. हा मिशनरी होणार की काय?
बिल पुन्हा वॉल स्ट्रीटवर दाखल झाले आणि पूर्व परिचित असलेल्या एका ब्रोकरेज शॉप मध्ये काम करायला लागले. ॲक्रॉन मधील ओहयो येथे एका मशीन टुल्सच्या कंपनीचा ताबा घेण्यासाठी त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले. मे १९३५ मध्ये बिल त्या कंपनीचा ताबा घेण्यासाठी जी लढत होणार होती तिथे त्यांच्या पार्टी सोबत पोहोचले. त्या कंपनीचा प्रेसीडेंट झाल्याचे स्वप्न बिल बघू लागले. पण लढत सुरू झाली तेव्हा दुसऱ्या पार्टीची बाजू वजनदार झाली आणि बिलची पार्टी हरली. त्यांच्याशी परिचीत असलेले लोक नाउमेद झाले आणि मेफ्लॉवर हॉटेल मध्ये बिलना एकटे सोडून ते निघून गेले. तो शुक्रवार होता. बिलकडे फक्त १० डॉलर्स होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी बिलनी सामान पॅक केले आणि हॉटेल लॉबी मध्ये ते आले. हॉटेलच्या लॉबीच्या एका बाजूला बार होता. तिथून हास्य विनोद करणाऱ्या कुटुंबाची मौजमजा ऐकायला मिळत होती. बिलना काही सूचत नव्हते, काय करावे. बारकडे त्यांची पावले ओढली जात होती. दारू नको पण बारमध्ये जाऊन एक जींजर एलचा ग्लास प्यायला काय हरकत आहे. पण हा विचार त्यांना अत्यंत भितीदायक वाटला. दुसरा विचार आला आपल्यात जी आसक्ती निर्माण झाली आहे तिला आवर केवळ दुसऱ्याला मदत करूनच आपण घालवू शकतो. ज्या प्रमाणे एखाद्या सफरिंग अल्कोहोलिकला दुसऱ्या मद्यप्याची गरज असते त्याच प्रमाणे त्यांना एखाद्या अल्कोहोलिकची गरज असल्याचे जाणवले.
त्यांनी त्या लॉबी मधील चर्च डिरेक्टरी उचलली आणि फादर वॉल्टर टंक ह्यांना फोन केला. त्यांनी त्यांना अशा लोकांची माहिती विचारली जे बिलची एखाद्या अल्कोहोलिक बरोबर भेट घडवून आणतील. फादर वाल्टर टंक हे ऑक्सफर्ड ग्रुपशी परिचीत होते. बिल एक मद्यपी आहेत आणि मद्यापासून दूर रहाण्यासाठी त्यांना एका मद्यपीची गरज आहे. त्यांनी दहा जणांचे नंबर बिलना दिले. बिलनी त्यांना फोन करण्यास सुरुवात केली. शनिवारची ती दुपार होती. काही जण घरी नव्हते. काहींना मद्यपी बद्दल काहीही देणे-घेणे नव्हते. असे करता-करता केवळ एक नाव शिल्लक राहिले ते म्हणजे हेनरिटा सेबरलिंग. बिलना माहीत होते हेनरिटा ही गुड-इयर रबर ह्या कंपनीच्या संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या माणसाची पत्नी असण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या माणसाकडे आपण आपली समस्या सांगायची हे धाडस त्यांना होईना. पण एक आवाज त्यांना येत होता 'तू तिला फोन केलेला चांगला.' बिलने तिला फोन केला. हेनरिटा ही फोनवर बोलत होती, तिने बिलची समस्या ऐकून घेतली. तिने त्याला घरी बोलावले. ती ऑक्सफर्ड ग्रुपशी परिचीत होती. जेव्हा बिलनी स्वतःची स्टोरी तिला सांगितली ती म्हणाली, 'मी तुझ्यासारख्या एका माणसाशी परिचीत आहे. ते डॉक्टर आहेत त्यांचे नाव डॉ. बॉब. त्यांच्या पत्नी ॲनी ह्यांच्याशी मी बोलते आपण त्यांना इकडे बोलवूया.' हेनरीटाने ॲनीला फोन केला आणि बिल बद्दल सांगितले. ॲनी म्हणाल्या, 'आज आम्हाला जमणार नाही. मदर-डे च्या दिवशी बॉब जास्तच गोंधळ घालतो. तो घरी आलाय येताना तो एक झाडाची मोठी कुंडी घेऊन आलाय, ते झाड त्याने टेबलावर ठेवलंय आणि स्वतः टेबलाखाली पडलाय. तेव्हा आज जमणार नाही.' हेनरीटाने त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी जेवनाचे आमंत्रण दिले. ॲनीने येण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी पाच वाजता दुपारी डॉ. बॉब आणि ॲनी हेनरीटाच्या घरी आले. डॉ. बॉब ही ती व्यक्ती होती जी बिल ह्यांची ए. ए मधील पहिला मित्र आणि भागीदार होणार होती. ॲक्रॉन येथील ए. एच्या ग्रुपचे ते संस्थापक होणार होते. सिस्टर इग्नेशिया आणि डॉ. बॉब ह्यांनी ५००० अल्कोहोलिकवर उपचार केले. ते ए. ए ह्या जागतिक संघटनेचे सह-संस्थापक ठरणार होते. पण त्या दिवशी ते एखाद्या संस्थापकासारखे दिसत नव्हते. ते थरथर कापत होते. आल्या-आल्याच बॉब म्हणाले, ते फार तर १५ मिनिटे थांबू शकतील, जास्त नाही. हेनरीटाच्या घरी जेवणे आटोपली. डॉ. बॉब जेवलेच नाहीत. नंतर हेनरीटाने डॉ. बॉब व बिल डब्लू. ह्यांना तिच्या लायब्ररीत बसवले. १५ मिनटे थांबलेले डॉ.बॉब हे नंतर रात्री ११ पर्यंत थांबले. बिल व बॉब च्या गप्पा रात्री ११ पर्यंत चालल्या. त्या वेळी बॉबचे वय ५५ आणि बिलचे ४० होते.
न्यूयॉर्कच्या बिझनेस असोसिएशननी बिलना काही पैसे पाठवले आणि ॲक्रॉन मध्ये राहून 'मशीन टुल्स' कंपनीचा लढा चालू ठेवण्यास सांगितले. डॉ. बॉब बद्दल काळजी वाटत असल्यामुळे ॲनीने बिल ह्यांना आपल्या घरी रहायला बोलावले. रोज सकाळी ते उठून मेडिटेशन करत. ॲनी फायर प्लेस जवळ बसून बायबलचे वाचन करी आणि नंतर ते तिघे एकत्र देवाच्या मार्गदर्शनासाठी करूणा भागत. तीन चार आठवड्यानी डॉ. बॉब बिलना म्हणाले 'मी मेडीकल कन्वेंशनसाठी नेहमी ॲटलांटीक सिटी मध्ये जातो, मी ते कधीही चुकवले नाही. तुला माझे आता जाणे योग्य वाटते का?' ॲनी घाबरली ती म्हणाली, 'नको-नको' पण बॉबचा चेहरा बघून बिल म्हणाले, 'का नाही?, तुम्ही जाऊ शकता, शेवटी आपल्याला अल्कोहोलने भरलेल्या या जगातच रहायचे आहे.'
डॉ. बॉब ॲटलांटिक सिटीला मेडीकल कन्हेंशनला गेले. काही दिवस त्यांच्याबद्दल काही कळले नाही. एके दिवशी बॉबच्या ऑफिस मधल्या नर्सचा फोन आला, 'ते इथे माझ्याकडे आहेत. रेलरोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून पहाटे ४ वाजता आम्ही त्यांना उचलून आणलंय. बघा तुम्हाला काही करता येईल तर, तुम्ही इकडे या. बिलनी आणि ॲनीने त्यांना घरी आणले. तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली, तीन दिवसांनी डॉ. बॉबना एक ऑपरेशन करायचे आहे जे केवळ तेच करू शकतात, आणि डॉ. बॉब तर एखाद्या पानाप्रमाणे थरथरत आहेत. आपण ह्यांना व्यवस्थित करू शकू का? असा प्रश्न पडला. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी डॉ. बॉब सोबर होते. पण फारच थरथरत होते. सकाळी ९ वाजता ते हॉस्पिटल मध्ये पोहोचले. बिलनी त्यांना एक बियरची बाटली दिली जेणेकरून त्यांची थरथर थांबेल व ते ऑपरेशन करू शकतील. डॉ. बॉब ऑपरेशन रूम मध्ये गेले आणि बिल व ॲनी घरी आले. काही वेळाने डॉ. बॉब चा फोन आला, सर्व ठीक आहे. पण डॉ. बॉब घरी आले नाहीत तर ते सरळ कार मध्ये बसून ज्यांचे देणेकरी होते आणि ज्यांना दुखावले होते त्यांना भेटायला ते बाहेर पडले.
तो दिवस होता १० जून १९३५. त्या नंतर डॉ. बॉब नी कधीही मद्य घेतले नाही, आणि हाच आपण 'ए. ए'चा जागतिक स्थापना दिवस म्हणून साजरा करतो.
डॉ. बॉब १५ वर्षे म्हणजे जीवनाच्या अंतापर्यंत मद्यमुक्त राहिले. १६ नोव्हेंबर १९५० साली त्यांचे निधन झाले आणि २४ जानेवारी १९७१ मध्ये बिल डब्लू. ह्यांचे निधन झाले. ते सुद्धा जीवनाच्या अंतापर्यंत मद्यमुक्त होते.
ए. ए संस्थेचा भारतात जन्म ...
भारतातील दिल्ली शहरात दोन व्यक्ती मिसेस सिल्वीया एस. ह्या अतिमद्यपानामुळे मद्यपाश या रोगाला बळी पडलेल्या होत्या. त्या दिल्ली येथील नेव्ही मधील डॉ. नेट्टो ह्यांच्याकडून मद्यपानावर उपचार करून घेत होत्या. डॉ. नेट्टो हे इंडीयन नेव्ही मध्ये मानसोपचार तज्ञ होते. त्याचप्रमाणे दुसरी व्यक्ती सुपांती एस. ह्यांना पण मद्याचा त्रास होता. डॉ. नेट्टो ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या दोन्ही व्यक्तींनी जी.एस.ओ., न्यूयॉर्क अमेरिका येथे पत्रव्यवहार केला. त्यावेळेतच कॅनडा येथील ए. ए सदस्य श्री. चाल्स् मार्शल जे मद्यपी होते पण बरीच वर्षे सोबर होते, त्यांची केंद्रीय फिल्म सेंन्सॉर बोर्डाकडून दिल्ली येथे नेमणूक झाली. त्यांनी संस्थापक बिल यांना, जी.एस.ओ. न्यूयॉर्कला ते भारतात दिल्ली येथे जात असून त्यांना सोबर राहण्यासाठी दुसऱ्या मद्यपिची गरज होती, त्यांनी अशी कोणी व्यक्ती दिल्ली येथे आहे का? ही विचारपुस केली. श्री. चाल्स् मार्शल ह्यांना तेथील कार्यालयातून दिल्ली येथील मिसेस सिल्वीया व सुपांती यांचे पत्ते देण्यात आले. श्री. मार्शल हे १२ एप्रिल १९५७ ला दिल्लीत दाखल झाले. एक आठवड्यातच त्यांना दिलेले दोन पत्ते त्यांनी शोधून काढले व स्थानिक वृर्तमानपत्रात कोणाला मद्यपानाची समस्या भेडसावत असल्यास त्यांनी दिलेल्या स्वतःच्या पत्यावर संपर्क करण्याची विनंती केली. त्याला मुंबईतील मद्यपानाची गंभीर समस्या भेडसावत असलेला एक व्यक्ती श्री. हेरॉल्ड (हॅरी) मथायस यांनी प्रतिसाद देऊन श्री. मार्शल यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटायला दिल्लीला गेले. त्यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. काही दिवस त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या मदतीने ए. एच्या तत्वांनुसार कार्यक्रमामुळे हॅरी एम. हे एक दिवसाच्या हिशोबाने दारू पासून दूर राहिले. मुंबईला परत आल्यानंतर इतर मद्यपींशी संपर्क साधून त्यांना एकत्रित आणून, चर्चा करून मद्यापासून दूर राहण्यासाठी कार्य करू लागले. दिल्लीमध्ये पण श्री. मार्शल ह्यांचे कार्य चालू होते. ट्रेव्हर हे त्यांच्या संपर्कात आले जे २४ ऑक्टोबर १९५७ पासून दारूपासून दूर राहिले. त्यांच्या मृत्युपर्यंत ते सोबर होते. बिगबुकात 'लाईफ सेव्हिंग वर्ल्ड' या नावाने त्यांची कहाणी प्रकाशित झाली.
ते लोनर मेंबर असल्याने त्यांच्या सैन्यातील एक अधिकारी म्हणून भारतातील निरनिराळ्या शहरात बदली झाल्यावर ए. ए चा संदेश देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्यामुळे सिकंदराबाद येथील आस्टीन आर. यांना संदेश मिळाला. ते आज ५० वर्षापेक्षा जास्त काळ सोबर आहेत. त्यांनी सिकंदराबाद येथे ए. ए.चा पाया रोवला.
मुंबईमध्ये ग्रुप सुरू होण्यापूर्वी २४ फेब्रुवारी १९५७ रोजी दिल्ली येथे ग्रुप चालू झाला. परंतू तो जास्त काळ चालला नाही. त्यावेळेस त्यांची संख्या ७ मेंबरची होती. मुंबईत ३० व्यक्ती एकत्र होऊन बांद्रा येथील सॅम सी. यांच्या निवासस्थानी ए.ए.च्या सभेस सुरुवात झाली. तेथून त्या सर्वांच्या प्रयत्नाने माहिम येथे विक्टोरिया चर्चच्या आवारात शाळेत सभा सुरू झाली. काही काळाने तेथून शाळेच्या दुरूस्तीच्या कामामुळे सेंट मायकेल हायस्कूल येथे सभा स्थलांतरीत झाली, ती आज माहिमचा फाऊंडेशन ग्रुप म्हणून ओळखला जातो. अशाच वेळी काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व समाजातील प्रतिष्ठीत मंडळींनी ए.ए. च्या कार्यास मदत करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक डॉ. एन. डी. गिल्टर हे होत. त्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, व्ही.टी. येथे सिमेन्स वार्डात अल्कोहोलिक्ससाठी वेगळ्या खाटा दिल्या. मिसेस बर्था कास्टीलिनो, मिस. आय. जी. कॅझन ह्या दोन्ही स्रियांनी फार मोठा मदतीचा हात ए.ए. ला दिला. त्यात एक डॉ. बालिगा यांनी ॲम्बेसेटर हॉटेल मध्ये एक कार्यक्रम आयोजित करुन रात्र भोजनाचा कार्यक्रम आयोजित करुन मुंबईतील सभासदांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला व आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली. परंतु सातव्या रूढीप्रमाणे हॅरी एम. यांनी ती मदत विनम्रपणे नाकारली. श्री. ए.डी. सलढाणा व श्री. स्टॅन घोन्सालवीस यांनी पण एए चा संदेश मुंबईत पसरविण्यास हॅरी एम. ह्यांना मदत केली.
एए चा भारतात इतिहास...
त्यावेळेतच १९६२ साली बॅलेरियन कार्डीनस, ग्रेशस, बिशप मुंबई मधील सर्व कॅथलिक स्कूलचे दरवाजे एए च्या मिटींगसाठी विनामुल्य उघडून दिले. कालांतराने मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त श्री. रत्नाकर गायकवाड (आय.ए.एस.) यांनी महापालिकेच्या शाळा एए सभांसाठी उघड्या करून दिल्या. (एक मिटींग प्रत्येकी एक रूपये) १९६५ पर्यंत मुंबईत फाऊंडेशन ग्रुप, दादर ग्रुप, बांद्रा ग्रुप हे प्रमुख ग्रुप कार्यरत होते. १० जून १९६५ दादर येथील ॲन्टीनिओ डिसिल्वा हायस्कूल मध्ये पहिले मोठ्या कन्वेशनचे आयोजन केले. हा कार्यक्रम ३० वा जागतिक स्थापना दिवस ह्या निमित्ताने आयोजित केला होता. फारच चांगला प्रतिसाद मिळाला. १९६५ मध्ये ग्रुपची संख्या ११ झाली. त्यातच भारतातील संस्थापक मुंबईचे श्री. हॅरी एम. यांचा ५ जून १९६७ मध्ये मृत्यु झाला, ते १० वर्ष सोबर होते.
त्यानंतर बांद्रा येथील एक सभासद ॲग्नेशियश पिन्टो यांनी आपल्या घरातील दूरध्वनी क्रमांक २ ऑगस्ट १९६७ पासून एए साठी दिला. १५ ऑगस्ट १९६७ रोजी ११ समुहांची एक सभा त्यांच्या निवासस्थानी झाली. गाईड लाईन तयार केल्या गेल्या. त्यात सुधारणा करण्याचे काम प्रो. ऑगस्ट डी. यांनी करून १५ जुलै १९७५ पासून अंमलात आणून माहिम येथे सेंट मायकेल शाळा येथे इंटरग्रुप कार्यालय व महिन्याच्या पहिल्या रविवारी मिटींगची सुरुवात झाली. ११ ग्रुपचे आय.जी.आर. येथे जमून एए च्या प्रगतीसाठी आणखी जास्त कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर इंटरग्रुप ताडवाडी माझगाव येथे भाड्याच्या जागेत स्थलांतरीत झाल्यावर इंटरग्रुपचे कार्यालय क्राईस्ट चर्च, कॅडल रोड, भायखला येथे सुरू झाले.
हळूहळू एए चे कार्य प्रगतीच्या दिशेने कूच करू लागले. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे अंदाजे २०० ग्रुप असून रोज ३५ ते ४० जागेत मिटींग होतात. ह्या २०० ग्रुप चे कार्य ११ इंटरग्रुपच्या सहकार्याने चालविले जात असून स्वावलंबी तत्वावर ही सर्व कार्यालये व एए च्या सभा चालतात.
...पुढे
...५ मे १९८७ ला भारतात जी.एस.ओ. ची स्थापना होऊन ८ मे १९८७ ला पहिली कॉन्फरन्स मुंबईला झाली. ह्या जी. एस.ओ. चे कार्य १६ 'बी' क्लास ट्रस्टी आणि ८ 'ए' क्लास ट्रस्टी याद्वारे चालते. ग्रुपमधून जमलेल्या पैशामधून शक्य तेवढी मदत ११ इंटरग्रुप मध्ये पाठविली जाते. ह्या ११ इंटरग्रुप मधून जी.एस.ओ. (भारत) यांना आर्थिक सहभाग म्हणून दिला जातो. भारतात अंदाजे आज १२०० ग्रुप आहेत आणि ६२ इंटरग्रुप आहेत. ह्यांच्या कडून सुद्धा जी.एस.ओ. (भारत) ला आर्थिक सहभाग दिला जातो. या मिळालेल्या ग्रुप, इंटरग्रुप व सभासदांच्या वैयक्तिक देणग्यातून जी.एस.ओ. (भारत) चे कार्य चालते आणि गरजेनुसार एए वाड्.मय छापले जाते.
आज हयात असलेल्या व्यक्ती की ज्यांचा एए भारतात आल्यापासून सतत मदतीचा हात पुढे आहे अश्या व्यक्तींचे आम्ही आभारी आहोत. त्यांची व्यक्तीशः नाव देणे व घेणे शक्य नाही, पण ह्या जुन्या एए सभासदांमुळे व सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय संस्था, चर्चचे फादर, शाळा, वार्ताहार, प्रसार माध्यम, वर्तमानपत्रे ह्यांचा अभूतपूर्व मदतीचा हात असल्याने एए चा भारतामधील ६३ वर्षाचा प्रवास कधी मंद गतीने तर कधी वेगाने चालू असून आम्ही आज ६१ व्या वर्षात पदार्पण करीत असून असाच प्रगतीचा वेग त्यांच्याच सहकार्याने आणि एए च्या प्रयत्नाने चालू ठेवू. त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत व ऋणी राहू.