.
एक अनुभव...
माझं नाव 'क्ष', मी मराठवाड्यात एक व्यावसायीक आहे.
दारु! हे नाव सुद्धा उच्चारायची भिती मला लहानपणी वाटायची. शाळेतून घरी येताना जर कुणी दारुडा झुलत-झुलत समोरून आला तर रस्ता बदलून पळत घरी येणारा मी. बराच वेळ छाती धडधडत असायची. लहानपणी अत्यंत हुशार, कलागुण अंगात असलेला, दुसऱ्यांच्या भावना-अडचणी समजणारा असा मी. 'आपण भले आणि आपला अभ्यास भला!' या विचारसरणीचा. अगदी यशस्वीरित्या शालेय शिक्षण पार पडले व 1980 साली उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेलो. तिथेही मी माझ्या शिक्षणात बऱ्यापैकी चमकलो. शिक्षण संपलं. त्यानंतर पुण्यात एका लॉजवर वास्तव्यास गेलो. त्या लॉजवर बरीच माझ्यापेक्षा मोठी मुले राहत होती. त्यांच्या संगतीत माझा प्रवास सुरु झाला. त्यांच्या अधून-मधून पार्ट्या व्हायच्या, सिगारेटच्या धुराचे लोळ उठायचे. हळू-हळू त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली, पण मी दारूला शिवत नव्हतो. खोलीत त्यांच्या सोबत पार्टीला बसायचो. ते दारू प्यायचे व जेवताना त्यांच्या सोबत मी जेवायचो. बऱ्याच वेळा मला ते दारू पिण्यासाठी आग्रह करायचे. मी ठाम नकार द्यायचो. कारण लहानपणापासून माझ्या मनावर जे बिंबवलं होतं की दारूमुळे संसार उध्वस्त होतात, माणसं भिकेला लागतात आणि मी लहान असताना माझ्या मामानं दारूच्या नशेत आत्महत्या केली होती अशा अनेक कारणामुळे माझ्या मनात दारूविषयी एक भिती होती.
असंच एका पार्टीत मला खूप आग्रह झाला. दारूचे दोन पेग पोटात गेलेले, सिगारेटचे झुरके घेत-घेत माझे मित्र मला आग्रह करत होते, म्हणत होते, "आरे, पोरी दारू पितात, मग तुला काय अडचण आहे?" असं बोलल्यावर दारूच्या बाटलीला मी आयुष्यात पहिल्यांदा स्पर्श केला. ग्लासभर पाण्यात टोपणभर दारू टाकून त्या दिवशी मी पिलो. दुसऱ्या पार्टीत दोन टोपणं, तिसऱ्या पार्टीत तीन टोपणं अशी टोपणांची संख्या वाढत गेली आणि एक दिवस मीही त्यांच्यासारखीच दारू प्यायला लागलो. ह्या पार्ट्या कुठलाही त्रास न देता मजा द्यायच्या. कुठल्यातरी वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटायचं. हळुवार तरंगायला लागायचं. लहानपणापासून जे ओझं माझ्या डोक्यावर होतं ते हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. या जगावेगळ्या अनुभवाची हळूहळू ओढ वाढायला लागली. मग काय? पार्टीला काय निमित्त कमी आहेत का? आज काय ह्या मित्राचा वाढदिवस, उद्या काय त्या मित्राने गाडी घेतली, परवा काय त्या मित्राचे लग्न, 31 डिसेंबर, रंगपंचमी, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच, मित्रांची प्रेमप्रकरणे अशी हजारो कारणे. कुठल्या ना कुठल्या निमित्तानं नियमितपणे दारूचा सहवास वाढत चालला.
1988 ला मी परत माझ्या गावी आलो. वर्षभर काहीही काम करत नव्हतो. त्या काळात भरपूर व्यायाम करून व चांगले खाऊन-पिऊन तब्येत कमावली. त्यानंतर वर्षा-दोन वर्षातच माझं लग्न झालं. माझा संसार सुरू झाला. नवीन धंदा, कामाचा ताण, पैशाची कमतरता, कांहीतरी करून दाखवायची जिद्द असा कांहीतरी प्रवास सुरू झाला. मित्रांसोबत अधूनमधून पार्ट्या व्हायच्या. रिलॅक्सेशन वाटायचं, धंदा वाढायला लागला, पैसा यायला लागला, कसरत वाढायला लागली व पर्यायाने रिलॅक्सेशनची जास्त गरज भासायला लागली. हळू-हळू दारूच्या पार्ट्या वाढायला लागल्या. पैसा भरपूर येत होता, प्रगती चांगली चालली होती, चांगलं नाव झालं होतं. एकीकडे जगात माझी प्रतिमा यशाच्या शिखरावर चढत होती आणि दुसरीकडे हळूहळू माझं पिणं पण वाढत होतं. तारूण्याची मस्ती अंगात होतीच. कुणी कांही चांगलं सांगितलं तर मी म्हणायचो, 'कुणाच्या बापाच्या पैशाची मी दारू पीत नाही, भरपूर काम करतो, भरपूर पैसा कमावतो, त्यातले थोडे पैसे मी माझ्यासाठी खर्च केले तर त्यात गैर काय? समाजात खूप लोकं दारू पितात तर मी कांही जगावेगळं करीत नाही.' अशा स्वरूपाचे खटके उडायला सुरूवात झाली. दिवसभर भरपूर काम केलेलं असायचं, भूक लागलेली असायची, त्यात दारू पिलेली असायची, त्या काळात घरात थोडं जरी मनाविरूद्ध झालं की मी राईचा पर्वत बनवायचो, ओरडायचो, बायकोला मारायचो, जेवणाचं ताट फेकून द्यायचो, उपाशी झोपायचो अशा तऱ्हेच्या विचित्र घटना माझ्या हातून घडायला लागल्या. 'शानदार ड्रिंक्स घेणे' ची जागा 'दारू ढोसणे' ने कधी घेतली हे मला कळले सुद्धा नाही. घरातली माझी प्रतिमा बिघडत चालली होती. दारूच्या अजगराचा विळखा माझ्याभोवती दिवसेंदिवस घट्ट व्हायला लागला. जीव गुदमरायला लागला. कुणाला काय बोलावं हे कळेना, मला काय होतंय हे ही कळेना. आपलं कांही खरं नाही हे मला स्पष्ट दिसायला लागलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं सर्व घडत असताना मी व्यसनी आहे हे मला मान्यच नव्हतं किंवा हे सर्व दारूमुळे घडतंय असं मला कधीही जाणवलं नाही. मी व्यसनी नाही तर माझे प्रश्न वेगळे आहेत, माझ्या समस्या वेगळ्या आहेत असंच मला सारखं वाटायचं. मी दारु पीत नाही तर मी 'ड्रिंक्स' घेतो! दारु पिणारे किंवा व्यसनी माणसं म्हणजे वेगळे आणि मी वेगळा आहे असं मला वाटायचं. मी प्रतिष्ठित 'ड्रिंक्स' घेणारा आहे. 'दारूडे' म्हणजे देशी दारुच्या दुकानासमोर पिऊन आडवे-तिडवे पडलेले, दागिने-घरातली भांडी विकून दारू पिणारे म्हणजे दारूडे अशी माझी समजूत होती. पण दारूडा या शब्दाची व्याख्या कळायला मला बरंच कांही बघावं लागलं, सोसावं लागलं.
हळूहळू घरात मी एकटा पडायला लागलो, मानसिक त्रास व्हायला लागला. कौटुंबिक नातेसंबंधातला दुरावा वाढत चालला. कालांतराने तर दारू पिल्याशिवाय मी घरात येतच नव्हतो. दिवसेंदिवस बायको बरोबर होणारी भांडणं, दारूचं वाढत जाणारं प्रमाण, त्या काळात कामावरचं लक्ष कमी व्हायला लागलं. पर्यायानं उत्पन्न घटायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस मी फाशीच्या खांबाकडे सरकत असल्याचा भास मला होत होता. अशा तऱ्हेने माझ्या आयुष्याची गाडी हळूहळू डगमगायला लागली. त्या शेवटच्या काळात तर मी फक्त दारूची बाटली आणायलाच घराबाहेर पडत होतो. चोवीस तास नशेत, जाग आली की भरपूर दारू प्यायची, दारू तोंडातून परत यायची. जेवण नाही, कुणाशी बोलणं नाही, दारू पिण्याव्यतिरिक्त कुठलीच कृती नाही. जणू काही मी दारू पिण्यासाठीच जगत होतो. या परिस्थितीत दुसरं काय होणार? पैसा कमी पडायला लागला, उसने-पासने सुरू झाले. दैनंदिन चरितार्थ ही चालणे मुश्कील झाले. तरी भरपूर पिणे सुरूच होते. या विचित्र परिस्थितीत मी सारखं रडायचो, मी बुडायलो आहे हे मला कळत होते पण मी कांहीच करू शकत नव्हतो. माझा मृत्यु मी डोळ्यानं रोज बघत होतो. आपलं आता काय होणार? अशी भिती वाटायला लागली. आता मला हे सर्व दारूमुळे घडतं आहे हे जाणवायला लागलं होतं. दारू सोडायचे मी असंख्य प्रयत्न केले, पण सर्व निष्फळ ठरले. दारू सोडायची माझी इच्छा असूनसुध्दा व मी प्रयत्न करूनसुध्दा माझी दारू सुटत नव्हती. शेवटी मला असं वाटायला लागलं की दारू आता या जन्मात बंद होत नाही आणि दारू आता आपला जीव घेतल्याशिवाय सोडत नाही.
दारू पिऊन-पिऊन मी स्वत:, माझा धंदा, माझी आर्थिक परिस्थिती, माझं कुटुंब, सर्व उद्ध्वस्त झालं. काम करायचं, पैसे कमवायचं, कांहीतरी करून दाखवायचं तर दूरच, आता तर मी जगूच शकत नाही असं मला वाटायला लागलं. माझ्या लैंगिक शक्तीवर सुध्दा दारूने परिणाम केला, दारू पिऊन-पिऊन मी षंढ झालो की काय असं वाटायला लागलं. त्याचा परिणाम म्हणजे मी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागलो. या सर्व विषण्ण अवस्थेमध्ये माझ्या डोक्यात आत्महत्तेचे विचार यायला लागले. सर्वस्व संपलं. या सर्व गोंधळामध्ये मी जीवंत राहिलो ही देवाची कृपा. बघता-बघता आमच्या गोकुळाची स्मशानभूमी झाली. शेवटी मी शारिरीक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्या अंगानं मार खाल्ला. परमेश्वराची कृपा व आई वडिलांची पुण्याई यामुळे मी रस्त्यावर आलो नाही.
असंच एक दिवस बायको बरोबर माझं कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात मी काठी तिच्या डोक्यात मारली. ती रक्तानं पूर्ण न्हाऊन निघाली. तरी माझी नशा उतरली नाही. दुसरे दिवशी बायकोच्या माहेरची माणसं आली. माझ्याबरोबर बरीच बोलणी झाली. 'मला आता इथे राहायचं नाही.' या निर्णयाला माझी बायको आली. मुलाला सोबत घेऊन बायको माहेरी गेली. माझ्या कुटुंबाची अगदी दयनीय अवस्था झाली. मी परत रोजच्या पेक्षा मोठा खंबा आणला. बस्स!... दु:ख आणि दु:ख!... फक्त दारू आणि दारू. तशा नशेत मी माझ्या मित्रांना फोन केला. मी त्यांच्याशी काय बोलत होतो, ते काय म्हणत होते हे मला आजही आठवत नाही. त्यातल्या एका मित्राने मला सरळ व्यसनमुक्ती केंद्राच्या दारात नेऊन उभा केले. मी पूर्ण नशेत होतो. डोळ्याला ताण देऊन मला कुठं आणले आहे हे जाणण्याचा मी प्रयत्न केला व मला व्यसनमुक्ती केंद्राचा बोर्ड दिसला. मी त्याच्यावर जाम खवळलो. त्याने गोड बोलून मला मध्ये नेले. तिथल्या व्यवस्थापकालाही मी शिव्या द्यायला सुरुवात केली. मी तर पूर्णपणे नशेत होतो. तिथे राहण्यास मी नकार देत होतो. पण मला यश आलं नाही. अत्यंत नाट्यमयरित्या त्यांनी मला त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या पिंजऱ्यात अडकवले.
दुसऱ्या दिवशी माझी नशा पूर्ण उतरली. मी तर पूर्णपणे जाळ्यात अडकलो होतो. आता बाहेर पडण्याची कसलीही आशा नव्हती. 35 दिवस आत. आयुष्यातील ही पहिलीच वेळ - एवढे दिवस माझं घर व माझी खुर्ची सोडून राहायची. तशाही परिस्थितीत माझ्या डोक्यात एक सद्विचार आला, 'चला, या ठिकाणी मी सुरक्षित आहे. मला फायदा होईल का नाही हे माहित नाही पण आपलं कसलंही नुकसान होणार या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण खात्री आहे!' आणि त्या सुरक्षित वातावरणाचा-एकांताचा फायदा घ्यायला सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रात एकांतात बसल्यावर माझ्या आयुष्याचा सगळा चित्रपट डोळ्यासमोरून जायला लागला... विचार यायचे... हा काय तमाशा झाला आपल्या आयुष्याचा? आपण कोण होतो आणि काय झालो ? आपल्या आयुष्याचे ध्येय काय होते? आणि आपण कुठे येऊन पडलो ?...भूतकाळात घातलेले गोंधळ... भविष्याची काळजी... असे एक नाही तर हजारो विचार एकाच वेळी मनात गोंधळ घालत होते, अत्यंत वाईट वाटायचं... प्रचंड पश्चाताप व्हायचा आणि आपण अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं.
'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस'ची माझी पहिली ओळख त्या व्यसनमुक्ती केंद्रातच झाली. मला योग्य वेळी परमेश्वराने मार्ग दाखवला. गेल्या 85 वर्षापासून संपूर्ण जगभर कार्यरत असलेल्या 'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' या संस्थेची कांही पुस्तकं माझ्या वाचनात आली. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसच्या 'प्रार्थना', 'फक्त आजचा दिवस', 'बारा पायऱ्या व रूढी' वाचत होतो, डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला सुरुवात झाली. मी व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडलो. घरी आलो. घर उदास वाटायला लागलं. एका उद्ध्वस्त खिंडारात राहत असल्यासारखा भास व्हायचा. घरी बायको नव्हती, माझा लाडका मुलगा नव्हता. डोक्यात कांहीही विचार यायचे, भिती वाटायची, काळजी वाटायची, हताश झालो होतो, आत्मविश्वास गमावला होता, माझ्याच नजरेतून मी उतरलो होतो. जगाची माझ्याकडं बघण्याची व मला वागवण्याची दृष्टी बदलून गेली. सर्व जण माझ्याकडे एका विचित्र नजनेने बघायचे, मला टाळायचे, माझ्या मागे माझी चेष्टा करायचे, मला हसायचे, माझ्या कुटुंबाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक द्यायचे, या गोष्टीचा मला खूप मानसिक त्रास व्हायचा. जीव नकोसा व्हायचा. पण तशाही परिस्थितीत भगवंताला फक्त एकच मागत होतो 'भगवंता, मला फक्त चांगला मार्ग दाखव, चांगली बुध्दी दे...' मला झोप यायची नाही, अस्वस्थ व्हायचं, भिती वाटायची, जीव घाबरायचा, पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं, रात्र-रात्र जागूनच काढायचो. काय करावं काहीच कळायचं नाही. पूर्ण हरलो - पैसा शून्य, मानसिक शक्ती शून्य, शारिरीक शक्ती शून्य, जनमानसातील प्रतिमा शून्य, भविष्याची आशा शून्य अशी माझी दयनीय अवस्था झाली.
असंच एके दिवशी सकाळी मी आमच्या गॅलरीत टाकलेलं वृत्तपत्र उचललं. चहा पित-पित वाचत होतो. त्यात 'मद्यपीस पत्र' असा एक लेख होता. तो मी वाचला. शेवटी दोन मोबाईल नंबर दिले होते. त्यावर मी फोन लावला. माझ्या आयुष्यात मी 'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' च्या पहिल्या माणसाला बोललो. खूप बरं वाटलं. वर्षानुवर्षे मी जे शोधत होतो ते आता मला सापडलं होतं. हळूहळू मी या संस्थेचा एक छोटासा भाग बनलो. नंतर या संस्थेच्या मिटींग्ज माझ्या गावातही सुरु झाल्या. आज मी नियमितपणे मिटींग करतो. आनंदी आहे.
'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस'च्या मिटींग्जचा मला खूप फायदा झाला. तिथं मला कुणी माझी खासगी माहिती विचारली नाही. माझं पूर्ण नावसुध्दा विचारलं नाही. कसलीही फी नाही, फॉर्म नाही. कसली नियमावली नाही, कसलीही सक्ती नाही. तिथं ज्या लोकांच्या भेटी झाल्या तेही या दुष्टचक्रातून बाहेर पडले होते आणि आज एक उपयुक्त आणि आनंदी आयुष्य जगत होते. त्यामुळे मला एक धीर मिळाला, एक आशा मिळाली. एक आत्मविश्वास निर्माण झाला की, ही माणसं आज छान आयुष्य जगू शकतात तर मी का नाही? त्यांची हळूहळू चांगली ओळख झाली. त्यांच्या समोर मी माझं मन मोकळं करायला लागलो. माझ्या समस्यांविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करायला लागलो. तिथं मला कुणी हसत नव्हतं, कुणी नावं ठेवत नव्हतं, माझ्या चुका कुणी काढत नव्हतं किंवा कुणी मला सल्लाही देत नव्हतं. ते फक्त त्यांचे अनुभव मला सांगत होते. आम्ही पूर्वी कसे होतो, आमच्या हातून काय-काय चुका घडल्या आणि या दुष्टचक्रातून आम्ही कसे बाहेर पडलो. ती माणसं मला समजून घेत होती, माझ्यावर प्रेम करत होती. माणूस म्हणून मला जो मान मिळायला पाहिजे होता तो तिथे मला मिळत होता. जीवन जगताना आनंद यायला लागला. मला हे वातावरण फार छान वाटायला लागलं आणि मी अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस मध्ये रमलो.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस मध्ये आल्यावर या आजाराविषयी बरीच माहिती मला मिळाली. अशी मी वेड्यासारखी का दारू पित होतो याची कारणंही मला इथंच मिळाली. त्या कृपाळू भगवंताचा मी आभारी आहे की ज्याने हा मार्ग मला दाखवला. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस ही संस्था जर मला मिळाली नसती तर आज मी हा अनुभव लिहीण्यासाठी जीवंत राहीलो नसतो. हे सत्य आहे.
दारूचा शेवटचा घोट घेऊन आता 16 वर्षे होऊन गेले आहेत. आज रोजी मला कसलाही त्रास नाही, कुटुंब व्यवस्थित आहे, छान व्यवसाय करतो, छान भूक लागते, शांत झोप लागते, विचार आहेत पण कसलाही तणाव नाही, व्यवस्थित काम करतो. बिघडलेले कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक संबंध बऱ्याच प्रमाणात सुधारले आहेत. दिवसेंदिवस भगवंताच्या अस्तित्वाचे अनुभव येत आहेत. आज जे कांही आहे ते परमेश्वराचंच आहे. त्यामुळं मी माझं डोकंच चालवत नाही. समोर येईल तेच कर्तव्य मानतो. परमेश्वर कसा आहे हे कुणीच बघितला नाही. पण अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसलाच मी परमेश्वर मानतो आणि त्यामुळेच मी आज माणसात आहे हा माझा विश्वास अगदी घट्ट झाला आहे. त्या परमेश्वरासमोर आज मी नतमस्तक आहे.
बस्स!