.
नवागताचे प्रश्न
प्रथमच ए. ए. संघटनेत येणाऱ्यांसाठी हे माहिती पत्रक आहे. नवीन येणाऱ्या व्यक्तीच्या मनात असलेले प्रश्न – जे आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आमच्याही पुढे उभे होते – सोडवण्याचा प्रयत्न येथे करीत आहोत.
परत-परत इच्छेपेक्षा जास्त तुम्ही पित असाल, पिण्यामुळे वारंवार अडचणीत येत असाल, प्यालानंतर बऱ्याच वेळा विस्मरण होत असल्यास, आपण मद्यपी, दारुडे, शराबी, किंवा अल्कोहोलिक असू शकता.
परंतु हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. ए. ए. मधील कोणीही तुम्हाला तुम्ही मद्यपी आहात किंवा नाही हे सांगणार नाहीत.
मदत घ्या. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस आपल्याला मदत करू शकेल.
ए. ए. म्हणजे मर्यादित प्रमाणात दारू पिण्याची ताकद घालवून बसलेल्या व त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या संकटात सापडलेल्या स्त्री-पुरुषांची संघटना आहे. आम्ही दारू विरहित आनंदी जीवनाचा मार्ग शोधत आहोत. आमच्यापैकी बहुतेकांस त्यात यश मिळाले आहे. आम्हास समजले आहे की, ह्यासाठी आम्हाला ए. ए.मधील इतर सभासदांच्या मदतीची व आधाराची गरज आहे.
ए. ए. मध्ये सभासदांची यादी अथवा हजेरीपट ठेवला जात नाही. तुम्हाला स्वतःबद्दल काही माहिती देण्याची गरज नाही. तुम्हाला परत यावयाचे नसल्यास कोणीही आपला पाठपुरावा करणार नाहीत.
तुम्ही ज्या कारणासाठी येथे आला आहात, त्याच कारणांसाठी ते सुद्धा येथे आले आहेत. ते तुमचे नाव बाहेर उघड करणार नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे अनामिकता पाळू शकता. या कारणांसाठी आम्ही स्वतःला 'अनामिक अथवा निनावी मद्यपी' म्हणवितो.
ए. ए.च्या सभा निरनिराळ्याप्रकारे चालविल्या जातात. परंतु सर्व सभांमधून तुम्हाला ए. ए. सभासद मद्यपानामुळे त्यांच्या जीवनात व व्यक्तीमत्वात काय स्थित्यंतरे घडली, मद्य थांबविण्यासाठी त्यांनी स्वतः काय प्रयत्न केले व आता ते कसे आयुष्य जगत आहेत ह्याबद्दल बोलताना आढळतात.
आम्हा सभासदांना, दारूची आसक्ती किती तीव्र असते याची जाणीव आहे. स्वतःला व दुसऱ्यांना मद्य न पिण्याची दिलेली आश्वासने पाळू न शकल्याचे दुःख आम्हाला माहित आहे. आम्ही उपचार करणारे धंदेवाईक नाही. दुसऱ्या मद्यप्याला मदत करण्यासाठी आम्ही स्वतः मद्यमुक्त आहोत ही एकच जमेची बाजू आहे. मद्यपानाची समस्या असलेले जेव्हा ए. ए. मध्ये येतात तेव्हा त्यांना सुधारणा शक्य आहे याची जाणीव होते, कारण ते ए. ए.त सुधारणा झालेले सभासद पाहतात.
आम्हा ए. ए. सभासदांची खात्री आहे की, 'मद्यपाश' हा आजार कधीही पूर्णपणे बरा होत नाही. आम्ही कधीही मर्यादित मद्यपान करू शकणार नाही आणि आमची मद्यापासून दूर राहण्याची क्षमता ही आमच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक निरोगीपणा टिकण्यावर अवलंबून आहे. हा निरोगीपणा आम्हाला नियमितपणे सभांना हजर राहून व तेथे समजलेल्या तत्वांचे आचरण करून मिळविता येतो. या व्यतिरिक्त आम्हास समजले की इतर मद्यपिडीतांना मदत केली तर आम्हास मद्यमुक्त राहण्यास मदत होते.
जेव्हा तुम्ही स्वतःला ए. ए. सभासद म्हणवता, तेव्हा तुम्ही ए. ए. सभासद व्हाल. ए. ए.चा सभासद होण्यासाठी मद्यापासून दूर राहण्याची इच्छा असणे हीच एकमेव आवश्यकता आहे आणि आमच्यापैकी बरेचजण प्रथम आले तेव्हा त्याबदल साशंक होतो.
ए. ए.चा सभासद होण्यासाठी कोणतीही वर्गणी नाही. ए. ए.चा समूह सर्वसाधारणपणे सभांमधून निधी जमवतो व त्याचा विनियोग भाडे, चहा इत्यादीचा खर्च भागविण्यासाठी होतो. सभासद स्वेच्छेने या निधीमध्ये सहभागी होतो.
नाही. धर्म, राजकारण किंवा इतर संस्था यांच्यापासून ए. ए. अलिप्त आहे.
बहुसंख्य ए. ए. सभासदांचा विश्वास आहे की, मद्यपानाच्या समस्येवरचा उपाय हा त्यांना स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर मिळालेला नसून, आपल्यापेक्षा उच्च शक्तीकडून मिळालेला आहे. ह्या उच्च शक्तीची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या समजुतीप्रमाणे करतो. पुष्कळजण याला देव म्हणतात; काहीजण ए. ए.हीच उच्चशक्ती मानतात तर काही जणांचा या संकल्पनेवर अजिबात विश्वास नसतो. ए. ए.मध्ये सर्व प्रकारच्या आस्तिक, नास्तिक लोकांसाठी प्रवेश आहे.
'खुल्या' सभांना नातेवाईक, मित्र, हितचिंतक मंडळी येऊ शकतात. स्थानिक गटांतून चौकशी केल्यास अधिक माहिती मिळेल.
ए. ए. जनरल सर्व्हिस ऑफिस ऑफ इंडिया किंवा आपल्या जवळच्या ए. ए. इंटर ग्रुपशी किंवा आपल्या ए. ए. सभेशी संपर्क साधा.
लक्षात ठेवा 'मद्यपाश' हा वाढत जाणारा आजार आहे. जरी आपणास वाटत असले की, आपण ह्या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत आहोत, तरी आपण याचा गांभीर्याने विचार करा. 'मद्यपाश' हा जीवघेणा आजार आहे. जर आपण मद्यपी असाल आणि जर आपण मद्यपान सुरूच ठेवले तर थोड्याच काळात आपली परिस्थिती चिंताजनक होईल.
- ए. ए. सर्व साधारण सेवा परिषदेने संमत केलेले साहित्य